मनामध्ये असू द्यावा
आठवणींचा कप्पा ,
मग दूर गेलेल्यांशी
मग दूर गेलेल्यांशी
मारता येतात गप्पा.
![]() |
Collected still of Playing Children From Balmandir |
या
ओळी खरोखर सार्थ आहेत. होऊन गेलेल्या अनेक गोष्टी मनःचक्षु समोर आणल्या
जातात त्या आठवणीमुळेच ! शाळेच्या बारा वर्षाच्या कालखंडात अश्या अनेक
गोष्टी आहेत ज्या विसरणे शक्यच नाही. अशाच काही आठवणीना कागदावर उतरवण्याचा
हा एक प्रयत्न !
शाळेचा पहिला दिवस कोण विसरू शकेल ? मला तो संपूर्ण दिवस आठवतो. बहुतेक
सर्व शिक्षिका मला माहित असल्यामुळे मला कुणाची भीती वाटत न्हवती. त्यामुळे
इतर मुलांप्रमाणे पहिल्या दिवशी शाळेत रडत न जाता उत्साहात मी शाळेला
गेलो. दारातच बयोबाई व सुशीलाबाईंनी मला ओळखले आणि त्या मला बालमंदिरात
घेवून गेल्या. आत आढाव आत्या , उर्मिलाबाई व शीतलताईना बघून मला खूप आनंद
झाला. मग सर्वांशी गप्पा मारून घसरगुंडी खेळायला गेलो. त्यानंतर प्रथानेची
वेळ ! सर्व अनोळखी मुले व मुली बाल्मान्दिराच्या हॉल मध्ये एकत्र जमली
होती. त्यावेळी शुभ्र साडीतील, शुभ्र वर्णाच्या एक अनोळखी बाई हजार होत्या.
त्यांना पाहून मनात एक अनामिक भीती तयार झाली. प्रथांना झाल्यावर आढाव
आत्या मला त्यांच्याकडे घेवून गेल्या. त्या होत्या आपल्या सर्वांच्या
प्रेमळ माईसाहेब !
बाल्मान्दिरामध्ये अनेक खेळ खेळलो, अभ्यास केला, विविध प्रकारची चित्रे
शीलाताईनि काढायला शिकविली. आढाव आत्यानी गोष्टी सांगितल्या तर उर्मिला
बाईबरोबर गाणी म्हंटली. पण त्यावेळी घसरगुंडी व झोपाळा हे विशेष प्रिय
होते.
बालमंदिरनंतर प्राथमिक मध्ये खेळाबरोबर अभ्यासही सुरु झाला. इयत्ता तिसरी
मध्ये असताना माईसाहेब आमच्या वर्गामध्ये येत असत. तसेच गणिते सोडवायला देत
आणि तपासात. एकेदिवशी त्यांनी गणिते घातली व नेहमीप्रमाणे ती मी सोडवली.
पण एक गणित चुकले. एक गुणिले एक बरोबर दोन असे मी लिहिले होते व नंतर दोन
ऐवजी शून्य करून दाखवले. त्यावेळी त्या खूप रागावल्या आणि डबा खाऊ दिला
नाही. वर्गातील सर्व मुले डबा खात होती व मी रडकुंडीला आलो. शेवटी सर्व
मित्रांनी आणि मैत्रिणीनी मला गाणित बरोबर करून दिले. पण तेंव्हा पासून एक
गुणिले एक बरोबर एक हे मी कधीच विसरलो नाही.
चौथीत असताना प्रथमच एक सर आम्हाला शिकवायला आले. त्यावेळी मी वर्ग
सेक्रेटरी होतो व दाराकडे पाठ करून काहीतरी बोलत होतो. त्यावेळी त्यांनी
मला पाठीवर मारले. त्यामुळे मी एकदम दचकलोच. हे म्हणजे आपले पाटील सर !
पुढे पाटील सर अगदी जवळचे वाटू लागले पण त्यांचा पहिला मार मी खाल्ला आहे.
प्राथमिक नंतर हायस्कूल मध्ये आल्यावर , स्पर्धात्मक युगाची जन येवू लागली.
वक्तृत्व, निबंध, एकांकिका ( एक पात्री ) अशा अनेक स्पर्धात मी भाग घेवू
लागलो. भूयेकर बाई मला विशेष मार्गदर्शन करायच्या. भूयेकर बाईनी लिहून
दिलेल्या एका एक पात्री नाटकामुळे मला नंबर मिळाला होता. राजगुरू बाई मला
वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन करायच्या. एकदा मी आजारी असताना त्यांनी
मला पिशवी भरून पुस्तके वाचायला दिली होती. तसेच सहावी नंतर २ इंग्रजी
पुस्तके मला भेट दिली होती. ती अजूनही मी जपून ठेवली आहेत.
इंग्रजीच्या बाबतीत तसा आमचा वर्ग सुदैवी ठरला कारण प्रत्येक इयत्तेत एक
नवीन इंग्रजीचे शिक्षक आम्हाला लाभले व त्यांच्या जवळचे ज्ञान आम्हाला
मिळाले. इयत्ता सतावित असताना खेळात आमच्या वर्गाने विशेष नैपुण्य मिळवले व
त्यावर्षी जनरल चाम्पियनशिप मिळवली होती.
इयत्ता आठवी, नववी, दहावी हि वर्षे अभ्यासातच निघून गेली. शिंदे सर, जाधव
सर, शेलार सर यांनी नेहमीच चांगले मार्गदर्शन केले. वर्दे बाई नेहमी
आमच्याशी चांगल्या वागल्या.
अशाप्रकारे शाळेतील प्रत्येक शिक्षक घरातील माणसाप्रमाणे वाटत असत.
किंबहुना शाळा एक कुटुंबच वाटत असे. पण जगाच्या विशाल प्रांगणात एका नव्या
उत्साहाने पाऊल ठेवण्यासाठी शाळेने तयार केलेला अत्म्विश्स्वास नेहमीच
उपयोगी पडेल.
शाळेत आलेला प्रत्येक अनुभव नेहमी उपयोगी पडलेल्या अश्या या शाळेतील सर्व आठवणींनी मन आनंदित होते.
या शाळेचा मी सदैव ऋणी राहीन शाळेचा अनुभवलेला आनंद पुन्हा कधीच मिळणार नाही.
आह ! सुंदरते दिन हरपले मधुभावांचे वेड जयांनी मनाला लावले.
Author
Ganaraj Shree. Makote.