Saturday, April 21, 2012

आठवणींचा ओलावा [ भाग १ ]

जुलै महिन्याची सुरवात होती. अर्थातच पावसाला होता. मेघराज धो-धो पाऊस ओतत होता. अशाच वेळी मी प्रथम माईसाहेब यांना भेटायला गेले होते. अर्थातच नोकरीसंबंधी, नुकतीच डी.एड. होऊन बाहेर पडले होते. नोकरी करण्यासाठी केवळ डी.एड. झाले न्हवते तर शिक्षक म्हणून कसे शिकवावे याचे अभ्यासू ज्ञान व्हावे म्हणून. माझ्या डी.एड. च्या प्राचार्य सौ. मोहिनिताई जोशींनी मला एक दिवशी बोलावले आणि विचारले कि माईसाहेब सकाळची मोन्तेसरी सुरु करत आहेत आणि तुम्ही जाता का ? प्रथमताच मी कोणताही विचार न करता मी झटकन बाईना सांगितले कि मी शिवान डिप्लोमा करत आहे आणि मला कस जमणार. त्याक्षणी बाई काहीही बोलल्या नाहीत पण दुसर्या दिवशी त्यांनी मला परत बोलावून सांगितलं कि तुम्ही डिप्लोमा साठी थोड्या मागे पुढे वेळाने आलात तरी चालेल. त्यावेळी मी बाईना स्पष्ट शब्दात माझे मनातले विचार सांगितले कि माझे आणि माईसाहेब यांचे पटणार नाही. त्याच क्षणी बाईनी मला समजुती च्या स्वरात सांगितले ज्या दिवशी पटणार नाही त्या दिवशी पाहू. तुम्ही आधी जा तर. खरोखरच आता वाटत मा. मोहिनीताई यांनी माझ्यावर अनंत उपकार केले ते कधीही मी कोणत्याही प्रकारे फेडू शकणार नाही. या उपकारांची शिदोरी घेवून मी आज २० - २१ वर्षे माईसाहेब यांच्या संस्थेत नोकरी करत आहे. माझे आणि माईसाहेब यांचे पटणार नाही अशी दुराग्रही भूमिका घेवून घरी बसले असते तर अनेक चांगल्या गोष्टीना मी मुकले असते.
माईसाहेब यांनी ज्यावेळी सकाळचे बालमंदिर सुरु केले होते त्या सकाळच्या बालमंदिरामध्ये मी रुजू झाले. मी ज्या वेळी त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी माझी मुलाखत अशी घेतलीच नाही आणि Certificate सुद्धा पहिले नाही. माईसाहेब आणि माझी कोणतीही पूर्वओळख न्हवती. त्यांना मी भेटले आणि सांगितले कि मी श्री. मोहिनिताई जोशीबाई यांचे कडून आली आहे. त्यांनी फक्त माझे नाव विचारले आणि उद्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत या असे सांगितले. बोलावाल्यानातर जायलाच हवे म्हणून तेथून पूर्ण बसची चौकशी केली. त्यावेळी ताराबाई पार्क म्हणजे अगदी निर्मनुष होते. वेळेवर बस न्हवत्या पण त्या सकाळच्या वेळी सुद्धा मी कधीही वेळाने गेले नाही. कारण माईसाहेब यांना हे आवडणार नाही हे मनावर ठसले होते. आणि त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होतीच.
माईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी बाल्मान्दिराचा वर्ग घेवू लागली. त्यांची तशी जवळीक झाल्याने त्यांच्या आवडी - निवडी , त्यांच्यातील नीटनेटकेपणा, आणि सर्व मुलांना अहो - जाहो बोलण्याची सवय या सर्व गोष्टींची मला चांगलीच ओळख झाली. आणि त्यांच्यातील नीटनेटकेपणा आणि कष्ट करण्याच्या गुण त्यांच्या इतका नाही तरी थोडातरी माझ्याकडे यावा अस मला वाटत. माईसाहेब यांची टापटीप आणि कामसूपणा तर लक्षात आलाच. माईसाहेब त्यावेळी स्वतः सर्व कपाटे लावून घ्यायच्या आणि कोणती वस्तू कोठे ठेवली आहे हे बंगल्यात बसून सांगायच्या. खरोखर त्यांच्या स्मरणशक्तीचे कौतुक वाटते. हे परमेश्वराची देणगी आहे. , कि हा एक गुण आहे , कि अवगत कला आहे या गोष्टीचा उलगडा २० वर्षे झाली पण अजून झालेला नाही. 

Author
Vimal Makote


[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]