Monday, December 2, 2013

मागे वळून पाहताना भाग ८: नियम

मागे वळून पाहताना
[ भाग ८: नियम ]

हि शाळा आपोआपच वाढायला लागली. मी १० विद्यार्थी ज्यावेळी घेतले त्यावेळी माझ्या ओळखी नव्हत्या. कोल्हापुरातच राहायचं मी मनाशी ठरवलं होत, हेच कार्यक्षेत्र मी निवडल होत. आमच्या शाळेचे उद्घाटन झाल. त्यावेळी कोल्हापूरचे पंतप्रधान समारंभाला आले होते. युरोपियन होते. त्यांना मराठी येत नव्हत. इथले बरेच लोक त्यावेळी समारंभाला आले होते. संस्थांनी शामियाना उभा केला होता. या समारंभानंतर पाच-दहा लोकांनी शाळेत आपल्या मुलाची नाव नोंदविली. अश्या तऱ्हेची शाळा कोल्हापुरात नव्हती. विद्यापीठ संस्थेची शाळा होती. पण त्यावेळी ती फारशी प्रसारात नव्हती. हळूहळू हि विद्यार्थी संख्या वाढायला लागली. शाळा वाढीसाठी मला जाहिरात अशी कधी करावी लागली नाही. विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी असते. परंतु मीच स्वतःवर काही बंधन घालून घेतली आहेत. सध्या सातशे-साडेसातशे विद्यार्थी आहेत. प्रवेशासाठी पूर्वी शाळेच्या आवारात रात्री झोपायला येणारे पालक मी पहिले. मला ते बरे वाटेना. म्हणून मी प्रवेशाबद्दल ठराविक तारखेपर्यंत पालकांनी पत्रे पाठवायची पद्धत सुरु केली. विद्यार्थ्यात हा चांगल, तो वाईट असा भेदभाव केला नाही. प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती घेण, पालकांच्या मुलाखती घेण हा प्रकार अजिबात नाही.
आता हि शाळा दहावीपर्यंत झाली आहे. या पंधरा -वीस वर्ष्यात आमच्या शाळेच नाव खूप झाल आहे. आत्तासुद्धा प्रवेशाची दोन वर्षांची माझी यादी तयार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच प्रवेश घेतल्यापासून शाळा सोडून जाईपर्यंत रेकॉर्ड असतं. शाळा सोडून जाताना ती फाईल त्यांच्याकड परत दिली जाते. मुलाकड वैयक्तिक लक्ष देण हे मी प्रथमपासूनच कटाक्षाने पळाल आहे. मुलांच्या सवयी, आवडीनिवडी याबाबतीत शिक्षकांना प्रत्येक मुलाची माहिती हवी. मुलांशी इतक्या प्रेमाने वागाल पाहिजे कि, त्यान घरातल्या गोष्टी विश्वासान तुमच्या जवळ सांगितल्या पाहिजेत. आईजवळ मुल जस विश्वासान बोलत तसच त्या मुलान शिक्षकाजवळ बोलायला हवं. या पद्धतीच शिक्षकांनी मुलाशी वागाव. हे धोरण आजपर्यंत मी कायम ठेवलं आहे. आजही माझ्या शाळेतले शिक्षक मुलांना नावाने बोलावतात. प्रेमाने वागवतात. सध्या वर्गात साठ-साठ ,प्रसंगी सत्तर-सत्तर मुल आहेत. तरीसुद्धा मुलाकडे वैयक्तित लक्ष दिल पाहिजे. जो मुलगा अभ्यासात कमी असेल त्याला आम्ही पुढे बसवतो. त्या पालकांना बोलावून घेतो. त्यांना त्या मुलाच्या अभ्यासाविषयी आणि अन्य गोष्टींविषयी वारंवार सांगितलं जात. त्या मुलाची प्रगती होईल एवढे आम्ही पाहतो.


[ Read : Special Note for this article. ]   

0 comments:

Post a Comment